Back to website

Sunday 1 May 2016

विसावा



तळ ठोकणार आहे इकडेच कायमचा असं कुठे म्हणतीए मी 
पण आता आलाच आहे वाटेत हा विसावा तर घुटमळते ना क्षणभर !

करायचाच आहे ठरलेला प्रवास... नाही कुठे म्हटलंय मी
पण मिळतोच आहे थोडा गारवा तर विलसते ना क्षणभर !

भरकटणार नाहीच आहे मीच निवडलेल्या वाटेवरून मी
पण भार उतरवून तना-मनावरून उधळते ना क्षणभर !

हो, तुच आणून उभं केलंस या वाटेवर... तुझं श्रेय नाही घेणार मी
पण वाटेवरच्या ज्ञात-अज्ञात गमती-जमतींवर खिदळते ना क्षणभर !

असले बरेच खाचखळगे आणि कडेकपारी तरी प्रारब्धाची फुलंच मानली मी
पण त्यातल्याच एका फुलाचा सुगंध उरात भरून हरखते ना क्षणभर !

स्वीकारतेय ना तुझी सगळीच सुमधुर, कर्णकर्कश, श्रवणीय, बीभत्स गीतं मी
पण मंद शब्दांची सळसळ कानात साठवून डुलते ना क्षणभर !

आखीव-रेखीव, सुबक, नीटनेटकं असा तकलादू हट्ट कधी धरलाच नाही मी
पण हाताशी येऊन सुटलेल्या, निसटलेल्या क्षणांवर रुसते ना क्षणभर !

नाही म्हणता-म्हणता रमलेच की वाटेवरच्या प्रत्येक वळणाशी मी
पण रमता रमता थोडंसं थांबून सुटलेलं भान शोधते ना क्षणभर !

दिपणारया डोळ्यांना सताड उघडे ठेऊन वाटेला सामोरी जाणारच आहे मी
पण मननाच्या पारावर बसून दिपवणाऱ्या घटनांचा अर्थ कवटाळते ना क्षणभर !

लोभसवाण्या मोहांना मागे टाकून तुझ्या स्वाधीन होणारच आहे मी
पण मायेच्या प्रांगणात उतरण्याआधी स्वतःवर हक्क गाजवते ना क्षणभर !

सगुणाच्या हातात हात देऊन निर्गुणाच्या कुशीत झेपावणारच आहे मी
माधुरीच आहे मी खरी पण तनुजा म्हणून जगते ना क्षणभर !

 By  Tanuja Sawant